UPS Scheme : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने गेल्या 5 महिन्यांपूर्वी ऑगस्ट 2024 ला घोषित केलेल्या UPS (Unified Pension Scheme) ची अधिसूचना नुकतीच 24 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ज्यावेळी या योजनेची घोषणा करण्यात आली, तेव्हाच ही योजना कशी आहे आणि तिची जुन्या पेन्शन शी तुलनाच होऊ शकत नाही हे विविध संघटनेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले होते.
UPS Scheme New update
१)UPS मध्ये कर्मचाऱ्याची सेवा ही त्याच्या मूळ नियुक्ती तारखेपासून न मोजता त्याच्या DCPS/NPS मधील नियमित कपाती च्या कालावधी नुसार मोजली जाणार आहे, अर्थात जितकी कपात तितकी सेवा
२) UPS मध्ये 50% पेन्शन साठी किमान 25 वर्ष कपात असणे आवश्यक असेल, त्यापेक्षा कमी सेवेला त्याप्रमाणात कमी पेन्शन मिळेल.. उदा- 20 वर्ष सेवा तर 40% पेन्शन.
३) कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण कर्मचारी कपात रक्कम परत मिळणार नाही, तर त्यातून एक विशिष्ट रक्कमच मिळेल.. जी शेवटच्या वेतनाच्या 10% × एकूण कपात वर्षाचा सहामाही कालावधी, असेल, ही मिळणारी रक्कम एकूण जमा रकमेच्या 8 ते 10% च असेल व उर्वरित 92% ते 90% रक्कम ही जप्त होईल.
४) UPS योजनेत VRS स्वेच्छा निवृत्ती लाभ असणार नाही, कारण 25 वर्ष अर्हताकारी सेवेनंतर VRS घेतला तरी पेन्शन वयाच्या सेवानिवृत्तिच्या वया नंतर 58/ 60 व्या मिळणे सुरू होईल.
५)UPS मधील मिळणाऱ्या पेन्शन ला भविष्यात वेतन आयोग लागू असणार नाही.
६) 80+ वया नंतर मिळणारी पेन्शन वाढ यात असणार नाही.
एवढ्या साऱ्या अटी मान्य करून आपली कपात सरकार ला देऊन तरी आपल्याला 50% पेन्शन मिळेल अशी भाबडी आशा कर्मचाऱ्यांना आणि आम्हालाही होती. कारण तसा उल्लेख UPS बाबत केबिनेट निर्णयाच्या प्रेस नोट मध्ये होता.
युनिफाईड पेन्शन स्कीम गॅजेट
आता यात पुन्हा एक नवीन जाचक अट सरकारने या अधिसूचनेच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे ती म्हणजे ‘बेंचमार्क कॉर्पस’.
बेंचमार्क कॉर्पस म्हणजे अशी रक्कम जी हमी दिलेली पेन्शन (25 वर्ष-50% पेन्शन ,20 वर्ष 40%,यानुसार) मिळण्यासाठी UPS खात्यात असणे आवश्यक असेल.. अशी टार्गेट सेट केलेली रक्कम म्हणजे बेंचमार्क कॉर्पस..
कर्मचाऱ्याच्या UPS खात्यात प्रत्यक्ष असणाऱ्या रकमेला वैयक्तिक कॉर्पस (Individual Corpus -I.C.) नाव दिले आहे.
UPS मध्ये आता कर्मचाऱ्यांचे IC खात्यात 10% कर्मचारी हिस्सा व शासनाचे 10% अशी 20% रक्कम जमा होत राहील व यात UPS स्विकारणाऱ्या NPS कर्मचाऱ्यांची मागील 24% ची NPS रक्कम ही वर्ग केल्या जाईल.. व UPS मध्ये मिळणाऱ्या एकूण 18.5% शासन अंशदान पैकी EXTRA चे 8.5 % शासन अंशदान हे पूल कॉर्पस म्हणून वेगळे राखीव ठेवले जाईल.
जेव्हा कर्मचाऱ्याच्या UPS खात्यातील वैयक्तिक कॉर्पस (IC) हे सरकारने ठरवून दिलेल्या बेंचमार्क कॉपर्स रकमे एवढे असेल तेव्हाच तो 50% पेन्शन साठी पात्र होईल.. ती कमी असेल तर त्याप्रमाणे कमी पेन्शन मिळेल.
नुकत्याच आलेल्या अधिसूचनेत 50% पेन्शन चे जे सूत्र दिले आहे ते पुढीलप्रमाणे- ते बघणे आणि समजून घेणे महत्वाचे आहे..
मिळणारी पेन्शन =
P Q B.C.
— × —– × ———- ) + DA
2 300 I.C.
●P म्हणजे Avg Basic ‘Pay’
( सेवानिवृत्ती पूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांचे सरासरी मूळ वेतन)
●Q – Qualifying Service कर्मचाऱ्याची अर्हताकारी अंशदान कपातीची सेवा ( महिन्यात ).. Q ची कमाल मर्यादा 300 महिनेच असेल.
● I.C.- Individual Corpus
(वैयक्तिक कॉर्पस- कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा झालेली प्रत्यक्ष एकूण रक्कम )
●B.C. – Benchmark Corpus ( बेंचमार्क कॉर्पस)
उदा.1)
अंतिम मूळ वेतन 100,000 ₹ (1लाख रु.) + DA महागाई दर 40% नुसार DA=40,000, एकूण अंतिम वेतन = 1,40,000 रु.असेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची त्याची एकूण नियमित अंशदान कपात सेवा 25 वर्ष ( 25 ×12 = 300 महिने )
UPS खात्यात जमा वैयक्तिक कॉर्पस रक्कम 60 लाख रु.
तर त्याला 50% पेन्शन साठी वरील सूत्रात = (100,000 ÷ 2 ) × 1 × 1 हे समीकरण येणे आवश्यक आहे तेव्हा
50,000 × 1 × 1 = 50,000 पेन्शन बेसिक आणि यात DA अशी एकूण पेन्शन रक्कम मिळेल..
इथे बेंचमार्क कॉर्पस ची रक्कम जर 1 कोटी रु असेल कारण महिन्याला 50,000 व्याज मिळण्यासाठी वार्षिक 6% नुसार 1 कोटी रु गुंतवणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात कर्मचाऱ्याची वैयक्तिक कॉर्पस रक्कम 60 लाख रु आहे असे मानले तर
मिळणारी पेन्शन =
1 लाख ₹ 300 60 लाख ₹
——– × —— × —————-
2 300 1 कोटी ₹
= 50,000 ₹ × 1 × 0.6
= 50,000 × 0.6
= 30,000 रु + DA अशी पेन्शन मिळेल..
म्हणजेच पेन्शन = 30,000 + 12,000 = 42,000 रु असेल., म्हणजे ज्यांना
1,40,000 रु वेतनावर 50% नुसार 70,000 रु पेन्शन ची हमी दिली होती त्यांना प्रत्यक्षात 42,000 रु पेन्शन इथे मिळत आहे..
ही पेन्शन त्याच्या शेवटच्या वेतनाच्या केवळ 30% आहे. 50% पेन्शन चा दावा करणाऱ्या UPS मध्ये प्रत्यक्ष 30% पेन्शन.
आता ही बेंचमार्क कॉर्पस ची रक्कम कशी ठरवली जाईल.?
तर त्याचे उत्तर या अधिसूचनेत स्पष्ट सांगितले नसले तरी जी उदाहरणे यात देण्यात आलेली आहे त्यावरून असा निष्कर्ष निघतो की बेंचमार्क कॉर्पस रक्कम म्हणजे अशी रक्कम की जी गुंतवल्या नंतर (तिची annuity खरेदी केल्यानंतर त्यावर दर महिन्याला त्या संबंधित कर्मचाऱ्यास त्याच्या शेवटच्या मूळवेतनाच्या 50% किंवा हमी दिलेल्या पेन्शन च्या टक्केवारी इतकी मूळ पेन्शन रकमे इतके मासिक व्याज / रिटर्न देऊ शकेल अशी UPS खात्यातील आवश्यक असणारी रक्कम म्हणजे बेंचमार्क कॉर्पस रक्कम.
सध्या Annuity चा दर 5.5% ते 6 % आहे, त्यानुसार आज
1 कोटी रु गुंतवले तर 6 % व्याजाने वर्षाला 6 लाख रु व्याज मिळतात, ही व्याजाची 6 लाख रक्कम 12 महिन्यात विभागली तर मासिक रक्कम (मासिक पेन्शन बेसिक) 50,000 रु मिळेल.. अर्थात शेवटचे सरासरी मूळ वेतन 1 लाख असणाऱ्या कर्मचाऱ्यास 50% पेन्शन म्हणजे 50,000 रु पेन्शन बेसिक साठी बेंचमार्क कॉर्पस 1 कोटी रु गणना होईल.वार्षिक annuity दर भविष्यात आणखी कमी झाला तर बेंचमार्क कॉर्पस चा आकडा वाढेल पर्यायाने पेन्शन ची टक्केवारी अजून घटेल..
उदा- २) कर्मचाऱ्याचे
अंतिम सरासरी मूळ वेतन 1 लाख रु आहे, आणि निवृत्तीवेळी
Annuity गुंतवणूक Rate (व्याज दर) 5% असेल तर
त्यामुळे Benchmark Corpus 1 कोटी 20 लाख रु निर्धारित केला जाईल.. कारण 1 कोटी 20 लाख रकमेला 5% दराने वार्षिक 6 लाख रु व्याज मिळू शकेल. ज्याला आपण मासिक प्रमाणे हिशोब केल्यास दरमाह 50,000 रु बेसिक पेन्शन मिळू शकेल.अश्यावेळी त्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्षात मिळणारी पेन्शन खालीलप्रमाणे येईल.
मिळणारी पेन्शन=
P Q B.C.
( — × —– × ——- ) + DA
2 300 I.C.
1लाख ₹ 300 60 लाख ₹
= ——– × —— × ———— + DA
2 300 1.2 कोटी ₹
= (50,000 ₹ × 1 × 0.5 )+DA
=25,000 +DA
=25,000+10,000 (DAदर 40%)
=35,000 ₹
अर्थात 1 लाख 40 हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यास ही पेन्शन 25% इतकी आहे.
उदा- 1 च्या तुलनेत उदा-2 मध्ये
जेव्हा बेंचमार्क कॉर्पस ची रक्कम वाढली अश्या स्थितीत पेन्शन मध्ये 30% वरून 25% घट झाली.
अशी घट तेव्हाही होईल जेव्हा सेवा कालावधी 300 महिन्यांपेक्षा कमी असेल.
उदा-3) वरील अंतिम मूळ वेतन 1लाख रु व 20 वर्ष (240 महिने) कपात सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यास 40% पेन्शन मिळण्यासाठी 5% Annuity नुसार बेंचमार्क कॉर्पस 96लाख रु सेट केला जाईल.. कारण त्याला 96 लाख रु रकमेवर 5% वार्षिक व्याज दराने 4,80,000 रु मिळाले पाहिजे असे गणित असते, जे महिन्यावर विभागले तर मासिक 40,000 रु होते, म्हणून इथे बेंचमार्क कॉर्पस 96 लाख रु असेल..
आता अश्या कर्मचाऱ्यास मिळणारी पेन्शन बघू, पेन्शन =
P Q B.C.
( — × —– × ——- ) + DA
2 300 I.C.
1लाख ₹ 240 48 लाख ₹
= ——– × —— × ———— + DA
2 300 96 लाख ₹
= (50,000 ₹ × 0.8 × 0.5 )+DA
=(50,000×0.40 )+DA
=20,000+DA
= 20,000+ 8,000 (DAदर 40%)
=28,000 ₹ म्हणजे एकूण वेतनाच्या
28% पेन्शन इथे मिळेल .. जेव्हा की 20 वर्ष सेवेवर 40% पेन्शन ची हमी होती पण प्रत्यक्षात 28% च पेन्शन मिळत असल्याचे चित्र आहे..
ही 28000 रु पेन्शन मिळण्यासाठी ही कर्मचाऱ्यास त्याच्या 48 लाख रु पैकी फक्त 5.6लाख रु परत मिळतील आणि जवळपास 42.4 लाख रु वर पाणी सोडावे लागणार आहेच..
एकंदर जर UPS मध्ये पेन्शन ही कर्मचाऱ्याच्या खात्यातील जमा कॉर्पस रकमेवर दिली जाणार आहे तर मग UPS NPS पेक्षा वेगळी कशी.? कारण ही बाब तर NPS मध्ये ही होती,मग UPS चा 50% पेन्शन किंवा निश्चित पेन्शन चा एवढा गाजावाजा कशाला केला.? यावर सरकार म्हणू शकते की आम्ही महागाई भत्ता देत आहोत, तर सरकार ला एक प्रश्न आहे की त्याबदल्यात आपण कर्मचाऱ्याचे अंशदान जप्त करत आहात त्याचे काय.? DA ची रक्कम ही त्या जप्त 60 लाख रु च्या रकमेतूनच तर आपण एकप्रकारे देताय.
मित्रांनो यात अजून एक नवीन खेळी सरकार कडून करण्यात आलेली आहे, ज्यामुळे बेंचमार्क कॉर्पस च्या रकमेएवढी रक्कम UPS खात्यात शेवटपर्यंत गाठणे अशक्य आहे..
ती खेळी म्हणजे UPS खात्यात 2 स्वतंत्र कॉर्पस हेड तयार करणे.. 1.वैयक्तिक कॉर्पस(IC) , 2.पुल कॉर्पस
वैयक्तिक कॉर्पस मध्ये कर्मचारी वेतनाचे 10% अंशदान + 10% शासन अंशदान जमा होईल तर शासनाचे 8.5 % शासन अंशदान हे त्या पूल कॉर्पस मध्ये जाईल.
या 8.5% शासन अंशदानातील (पूल कॉर्पस) रकमेचा वापर करून वाढीव DA देत रहावा असा दाखवण्याचा सरकार चा उद्देश आहे, मात्र याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या पेन्शन च्या टक्केवारीत कात्री लावणे हाच आहे.
एकंदरीत आयुष्यभराची कपात जप्त करवून देखील कर्मचाऱ्याला 50% पेन्शन मिळणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे.. ही अवस्था जर नियमित कपात असणाऱ्या कर्मचाऱ्याची असेल तर ज्यांच्या अनियमित कपाती आहेत, किंवा 25 वर्ष पूर्ण नाहीत त्यांची किती % पेन्शन कमी राहील याची गणना वेगळीच.
UPS अधिसूचना ग्रॅच्युटी
UPS योजनेच्या गॅजेट नोटिफिकेशन मध्ये कुठेही ग्रॅच्युटी मिळेल की नाही याचा उल्लेख सध्यातरी दिसून येत नाहीय, ज्यामुळे ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे, कारण ऑगस्ट 2024 मध्ये UPS जाहीर करतेवेळी प्रसिद्ध केलेल्या केबिनेट प्रेस नोट मध्ये UPS मध्ये दिली जाणारी लमसम रक्कम (शेवटच्या वेतनाच्या 10× एकूण सहामाही कपात सेवा अर्थात एकूण कपात वर्ष × 2) ही ग्रॅच्युटी रकमे व्यतिरिक्त असेल असा उल्लेख होता, म्हणजे ग्रॅच्युटी मिळेल असा स्पष्ट संकेत त्यावेळी देण्यात आला मग आता असा उल्लेख अधिकृतपणे UPS च्या अधिसुचनेत ग्रॅच्युटी बाबत उल्लेख का करण्यात आलेला नाही हा प्रश्न पडतो..
पण तूर्तास पेन्शन बाबत जो मोठा विश्वासघात करण्यात आलेला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे..
एकंदर जुन्या पेन्शन ला पर्याय म्हणून सांगण्यात येणारी आणि मोठा गाजावाजा केलेली UPS योजना कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक आहे हे स्पष्ट होते.
जी स्थिती NPS ची होती त्यापेक्षाही वाईट स्थिती या UPS ची असणार आहे.. याचा अर्थ NPS चांगली आहे किंवा महाराष्ट्राची सुधारित पेन्शन योजना (GPS) चांगली असेल असा अर्थ मुळीच नाही..
UPS असो , GPS असो वा NPS या एकाच नाण्याच्या 3 बाजू आहेत.. त्या कधीही जुनी पेन्शन ची बरोबरी करू शकत नाहीत.