State Employees : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४,७६, १४९, १५०, १५१, १५३, १५४ या कलमात नमूद केलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडाव्या लागतात.जिल्हाधिकारी याने नमूद केलेली नोंदणीपत्रके, रजिस्टर व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते.
जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठ्यास करावे लागते.
ग्राम महसूल अधिकारी
महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्यास पुढील अटींच्या अधिन राहून मान्यता देण्यात आली आहे.
(१) पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच, पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी/ वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही.
(२) सातव्या वेतन आयोगानुसार “तलाठी” या पदाची वेतनश्रेणी एस-८, रू.२५५००-८११००/- अशी आहे. तलाठी या पदनामामध्ये बदल केल्यामुळे या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळयाने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही.
(३) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.
सहाय्यक महसुल अधिकारी
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील “अव्वल कारकून” गट-क कर्मचाऱ्यांची “अव्वल कारकून” ऐवजी “सहाय्यक महसुल अधिकारी” असे पदनाम करण्याची मागणी, अव्वल कारकून या पदाची वेतनश्रेणी ६ व्या वेतन आयोगानुसार – वेतनबँड रू.५२००-२०२००, ग्रेड पे रू. ३५००/- अशी असून, ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनबैंड एस-१२ रु.३२०००-१०१६०० इतके आहे.
सदर पदनामामध्ये बदल केल्यामुळे कोणतीही वेगळी वेतनश्रेणी वा वेतनवाढ देय होणार नाही व वेतनामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे शासनावर कोणताही वित्तीय भार पडणार नाही किंवा त्यांच्या सेवा विषयक बाबींमध्येही कोणताही बदल होणार नाही या अधिन मान्य करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार खालील अटीच्या अधिन राहून महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील “अव्वल कारकून” पदाचे पदनाम “सहाय्यक महसुल अधिकारी” असे करण्यात येत आहे.
अ) वरीलप्रमाणे पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.
ब) सातव्या वेतन आयोगानुसार महसुल विभागांतर्गत अव्वल कारकून, गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली एस-१२ (९-१२: रू.३२०००-१०१६००) ही वेतनश्रेणी पदनाम बदलानंतर “सहाय्यक महसुल अधिकारी” यांना लागू राहील. या वेतनस्तरामध्ये अथवा वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची वा वेगळ्याने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारांत घेतली जाणार नाही.
क) वरीलप्रमाणे पदनाम बदलानंतर सध्याच्या गट-क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारांत घेतली जाणार नाही.
ड) महसूल विभागांतर्गत “अव्वल कारकून” गट-क संवर्गाचे पदनाम “सहाय्यक महसुल अधिकारी” असे बदलानंतर अन्य संवर्गातील “सहायक अधिकारी” पदासाठी असणारी वेतनश्रेणी / वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतनत्रुटी समितीपुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतली जाणार नाही.
कोतवाल – महसूल सेवक
राज्यातील कोतवालांनी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री महोदय व मा. लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवाल पदाचे पदनाम बदलून “महसूल सेवक” करावे, अशी मागणी केलेली आहे.
कोतवालांना चतुर्थ वर्ग श्रेणी लागू करणे व इतर मागण्यांच्या संदर्भात अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सचिव समितीची गुरूवार, दि.२९.८.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत समितीने कोतवाल पद हे ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असल्याने कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. त्यानुषंगाने कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार व कोतवालांची विनंती विचारात घेता, पुढील अटींच्या अधिन राहून महसूल विभागातील कोतवालांच्या पदनामात बदल करून “महसूल सेवक” असे पदनाम करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. पदनामामध्ये बदल केल्यामुळे कोतवालांच्या मानधनामध्ये तसेच सेवाविषयक बाबींमध्येही कोणताही बदल होणार नाही वा यासंदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही.