Special Casual Leave : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना अवयवदान (Organ Donation) केल्यास तब्बल 42 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव्ह (Special Casual Leave) म्हणजेच विशेष नैमित्तिक रजा मिळणार आहे.
विशेष म्हणजे या रजेच्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. म्हणजेच, त्यांना रजा आणि पूर्ण पगार दोन्ही मिळणार आहेत. सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली आहे.
Special Casual Leave for Government Employees
लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या विशेष रजेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारत सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा नियम लागू केला आहे. हा नियम केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. कर्मचाऱ्यांनी अवयवदान केल्यास त्यांना जास्तीत जास्त 42 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव्ह दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
2023 मध्ये जारी झाला होता आदेश !
विशेष रजेसंबंधीचा आदेश 2023 मध्ये कार्मिक मंत्रालयाने (Personnel Ministry) जारी केला होता. या आदेशानुसार, खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
- अवयवदान करणाऱ्या कर्मचाऱ्याला 42 दिवसांपर्यंतची रजा मिळू शकते.
- विशेष म्हणजे ही रजा शस्त्रक्रिया (Operation) किती मोठी किंवा लहान आहे यावर अवलंबून नसेल.
- कोणत्याही परिस्थितीत 42 दिवसांपेक्षा जास्त रजा मिळणार नाही,मग शस्त्रक्रिया मोठी असो वा लहान,
- सदरील रजेसाठी डॉक्टरांची मंजुरी आवश्यक आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय रजा मिळणार नाही.
- विशेष नैमित्तिक रजा कर्मचारी ज्या दिवशी रुग्णालयात दाखल होईल, त्या दिवसापासून सुरू होईल.
रजेच्या कालावधीत वाढ
सरकारी नियमानुसार, रजेच्या कालावधीत वाढ केली जाऊ शकते. परंतु, कोणत्याही परिस्थितीत 42 दिवसांपेक्षा जास्त रजा मिळणार नाही. जर एखाद्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर 7 दिवसांची रजा मंजूर करत असतील आणि नंतर त्यांना असे वाटले की रुग्णाला आणखी रजेची गरज आहे, तर ते रजेच्या दिवसांमध्ये वाढ करू शकतात. मात्र, यासाठी डॉक्टरांना लेखी स्वरूपात द्यावे लागेल.
विशेष नैमित्तिक रजा नियम
नियमानुसार,अवयवदान करणारी व्यक्ती ज्या दिवशी रुग्णालयात दाखल होईल,त्या दिवसापासून रजा लागू होईल. मात्र, येथे काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.
जर डॉक्टरांना असे वाटले की अवयवदानासाठी शस्त्रक्रियेपूर्वी त्या व्यक्तीला काही दिवस रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, तर अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेच्या जास्तीत जास्त एक आठवडा आधीपासून रजा मिळू शकते.