Anukampa niyukti : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग दि. २६.१०.१९९४ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केले आहे. शासन निर्णय/शासन परिपत्रकान्वये विहीत केलेली अनुकंपा कारणास्तव शासकीय सेवेत नोकरी देण्याबाबतची एकत्रित नियमावली आज आपण पाहणार आहोत.
अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतूदी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व कार्यालयात अनुकंपा कारणास्तव करावयाच्या नेमणूकांना हे नियम लागू राहतील.अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील तरतुदी ह्या केवळ शासकीय कर्मचा-यांपुरत्याच सीमीत आहेत.
सदर तरतुदी ह्या जिल्हा परिषदा / नगरपालिका / महानगरपालिका / महामंडळे / प्राधिकरणे / व्यापारी उपक्रम व इतर तत्सम आस्थापनावरील कर्मचा-यांना थेट लागू होणार नाहीत. त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील.
(१) अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ खालील शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुज्ञेय राहील
(अ) शासकीय कर्मचाऱ्यांना (रुपांतरीत स्थायी व अस्थायी आस्थापनेवरील शासकीय कर्मवारी धरून) (शासन, निर्णय, दि. २६.१०.१९९४)
आ) सेवा नियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी. (शासन निर्णय, दि. १०.७.२००९)
(२) शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या पात्र नातेवाईकांना खालील नमूद परिस्थितीत अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू राहील:-
(अ) शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय, दि. २२.०८.२००५)
(आ) गट अ/ब/क/ड मधील शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-यास नक्षलवादी/ आतंकवादी/ दरोडेखोर/समाज विघातक यांच्या हल्यात/कारवाईत मृत्यू आल्यास अथवा शासन सेवेत कार्यरत असतांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडल्यास अशा अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कुटुंबियातील पात्र व्यक्तीस, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना, त्यांचे नाव अनुकंपाधारकांच्या सामान्य प्रतीक्षासूचीमध्ये न घेता, त्यांची वेगळी यादी करुन पद उपलब्ध असल्यास, रिक्त पदांच्या ५ टक्के मर्यादेची (१० टक्के शासन निर्णय दि. १ मार्च, २०१४) अट शिथील करुन त्यांना सर्व प्राथम्याने अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. (शासन शुध्दीपत्रक दि. १७.०९.२०१२)
(इ) गट अ/ब/क/ड मधील जे शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी नक्षलवादी/ आतंकवादी/ दरोडेखोर/समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईमध्ये कायमस्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वतःहून शासकीय सेवा सोडून देण्याची लेखी अनुमती दिली आहे, अशा अधिकारी/कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या ५ टक्के (१० टक्के- शासन निर्णय दि.१ मार्च, २०१४) मर्यादेमध्ये प्राधान्याने नियुक्ती देण्यात येते.(शासन निर्णय, दिनांक १७.७.२००७)
अनुकंपा नियुक्ती देय पद
(अ) राज्य शासनांतर्गत कोणत्याही गट-क आणि गट-ड मधील सरळ सेवेच्या पदांवर त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील विहीत शैक्षणीक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता यईल. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. २८.०३.२००१)
(आ) ह्या नियमानुसार नियुक्ती मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्याची आवश्यकता नाही तसेच सदर पदावर अनुकंपा नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेण्याची आवश्यकता असणार नाही.
मात्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पोलीस उपनिरीक्षक,विक्रीकर निरीक्षक, मोटार वाहन उप निरीक्षक, रेंज वन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहायक वैद्यकीय अधिकारी,इ. गट- क’ मधील कार्यकारी (एक्झिक्युटीव) पदावर तसेच मंत्रालयातील सहायक पदावर नियुक्ती देता येणार नाही. तसेच निवडमंडळाचा सल्ला घेणे आवश्यक नाही. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. २१.११.१९९७)
(इ) लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदाखेरीज अन्य गट ‘क’ मधील कार्यकारी पदांवर नियुक्ती देण्यात यावी मात्र अशी नियुक्ती ही त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा भरतीची तरतुद आहे अशाच पदांवर देण्यात यावी.
अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबिय
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी खालील नमूद केलेले नातेवाईक पात्र राहतील व त्यापैकी एका पात्र नातेवाईकास नियुक्ती अनुज्ञेय राहील.
- पती/पत्नी,
- मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत), मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत)
- दिवंगत शासकीय कर्मचा-याचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून
- घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण,
- केवळ दिवंगत अविवाहीत शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. १७.११.२०१६)
- (आ) मृत अधिकारी/कर्मचा-यांच्या पति/पत्नी ने कोणाची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावी याबाबत नामांकन देणे आवश्यक राहील.
- मृत अधिकारी/कर्मचा-यांचे पती पत्नी हयात नसल्यास त्याच्या/तिच्या सर्व पात्र कुटुंबियांनी एकत्रित येऊन कोणाची नियुक्ती करावी याबाबत नामांकन करावे. (शासन निर्णय, दि. १७.०७.२००७)
कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र
अ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती ही कुटुंबातील एकाच पात्र नातेवाईकास अनुज्ञेय असल्याने (शासन, निर्णय, दि. २६.१०.१९९४) कुटुंबातील इतर सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आ) ज्या शासकीय कर्मचा-यांना वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा जास्त लग्न करण्यास प्रतिबंध नसेल अशा कर्मचा-याच्या एकापेक्षा जास्त पत्नी हयात असल्यास, ज्या पत्नीला किंवा तिच्या मुलाला/मुलीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायची आहे त्या व्यतिरिक्त अन्य पत्नीचे देखील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६)
अर्ज करण्यासाठी मुदत
(अ) अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने शासकीय अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिका-याकडे विहीत नमुन्यात परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, २२/८/२००५ व शासन परिपत्रक, दि. ०५.०२.२०१०)
(आ) सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबातील अज्ञान वारसदाराच्या बाबतीत एकाने सज्ञान म्हणजे १८ वर्षाचा झाल्यावर एक वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, दि. ११/९/१९९६ व शासन परिपत्रक,दि. ०५.०२.२०१०)
(इ) पात्र वारसदारास विहीत १ वर्षाच्या मुदतीनंतर २ वर्ष इतक्या कालावधिपर्यंत (मृत्यूच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंत) तसेच दिवंगत शासकीय कर्मचा-यांच्या अज्ञान वारसदाराच्या बाबतीत तो उमेदवार सज्ञान झाल्यानंतर विहीत १ वर्षाच्या मुदतीनंतर २ वर्षापर्यंत (सज्ञान झाल्यानंतर ३ वर्षापर्यंत) अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यास असा विलंब क्षमापित करण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांना देण्यात येत आहेत.
अनुकंपा नियुक्तीसाठी वयोमर्यादा
(अ) किमान वयोमर्यादा १८ वर्ष (शासन निर्णय, दि. ११.०९.१९९६)
(आ) कमाल वयोमर्यादा- वयाच्या ४५ वर्षापर्यंतच्याच उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असेल. त्यामुळे प्रतिक्षा सूचीतील उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षापर्यंत नियुक्ती न मिळाल्यास त्यांची नावे वयाची ४५ वर्ष पूर्ण होताच आवश्यक ती नोंद घेऊन प्रतीक्षासूचीतून काढून टाकण्यात यावीत. (शासन निर्णय, २२.०८.२००५ व दि. ६.१२.२०१०)
अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता
(अ) पात्र नातेवाईकाची शैक्षणिक अर्हता व निम्न वयोमर्यादेनुसार त्याला गट-क किंवा गट-ड मधील पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)
(आ) संबंधीत पदांसाठी विहीत शैक्षणिक पात्रता आणि निम्न वयोमर्यादा याबाबतच्या अटी या नेमणूकांसाठी कटाक्षाने पाळण्यात येतील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)
(इ) तथापि, दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त इतर अटी पूर्ण करीत असल्यास तिच्या बाबतीत गट-ड मध्ये नेमणूकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्याचे अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला असतील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)
(१३) गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत
(अ) अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विहीत वेगमर्यादेचे टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासन निर्णय, दि. ०६.१२.२०१० अन्वये ६ महिने असलेली मुदत वाढवून ती २ वर्ष इतकी करण्यात येत आहे.
अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती दिलेल्या व शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत नियुक्तीपासून २ वर्ष पूर्ण न झालेल्या उमेदवारांनाही सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्तीपासून २ वर्ष इतकी मुदत देण्यात येत आहे.
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत पदांची मर्यादा
(अ) शासन निर्णय दि. २२.०८.२००५ अन्वये विहीत करण्यात आलेल्या अनुकंपा नियुक्तीसाठी गट-क आणि गट-ड मध्ये प्रती वर्षी रिक्त होणा-या ५% मर्यादेमध्ये वाढ करुन ती गट-क व गट-ड मधील प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% इतकी करण्यात आली आहे. (शासन निर्णय, दि. ०१.०३.२०१४)
(आ) अनुकंपा तत्वावरील पदे सन २०१२ या भरती वर्षापासून गट-क आणि गट-ड मधील प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% मर्यादेत भरण्याची कार्यवाही सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी तात्काळ करावी. (शासन पूरक पत्र, दि. ०२.०५.२०१४)
(इ) शासन निर्णय, दि. ०१.०३.२०१४ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीवर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% ची असलेली मर्यादा दि. ०१.०३.२०१५ पासून पुढे २ वर्ष (दिनांक २८.०२.२०१७ पर्यंत) चालू होती. सदर १०% च्या मर्यादेस दि. ०१.०३.२०१७ पासून पुढे दोन वर्ष (दि. २८.०२.२०१९ पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे.
तथापि शासन निर्णय, वित्त विभाग दि. ०२.०६.२०१५ व दि. २३.०९.२०१५ अन्वये पदभरतीवर असलेले निबंध विचारात घेता, प्रस्तुत निबंध असेपर्यंत गट-क व गट-ड संवर्गातील एका वर्षात भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या १०% पदे ही अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावीत. (शासन निर्णय, दि. २८.१०.२०१५ व दि. ०३.०५.२०१७)