CMP Salary System : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात.
शासनामार्फत वेळच्यावेळी वेतन अनुदान अदा होऊनही सदर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वेतन जमा होण्यास विलंब होत होता.
New Salary Payment System
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद,महानगरपालिका/नगरपालिका यांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजूरी मिळते.
जिल्हा कोषागार कार्यालयाने तयार केलेले धनादेश अथवा EFT शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येतात.
शेवटी अशासकीय वजाती कपात करुन, वेतनाची रक्कम संबंधितांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याने, संबंधितांना वेतन अदा होण्यासाठी विलंब होतो.
शिक्षकसाठी नविन वेतन प्रणाली !
सदरील विलंब टाळण्यासाठी शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका/नगरपालिका यांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन व भत्ते इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली (ECS/EFT/NEFT) द्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर व मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालये वगळता सर्व कोषागार/उपकोषागार यांच्यामार्फत होणारी सर्व प्रदाने स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पुरविलेल्या सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याचा निर्णय घेतला असून, सदर प्रणालीसंदर्भात आहरण व संवितरण अधिकारी तसेच कोषागार कार्यालये यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे.
शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व कोषागार कार्यालय, नागपूर यांच्याकडील सर्व प्रकारची प्रदाने आहरण व संवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत ई- कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असून, त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीस मान्यता
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत / ज्या जिल्ह्यांत E-Kuber कार्यरत आहे अशा जिल्ह्यांत ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या बैंक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी (CMP) प्रणाली व ई-कुबेर (E-Kuber) प्रणालीमार्फत प्रदान करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी त्यांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.